मनोबल

‘मनोबल’ म्हणजे ”मनाचे सामर्थ्य’, आणि मनोबलची स्थापना करण्याचा उद्देशच हा आहे कि विशेष विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतांचा फायदा करून घेऊन आनंदी व आत्मविश्वासपूर्ण जीवन जगावे.

आपल्या समाजात व कुटुंबांमध्येही अंध व अपंग व्यक्तीकडे दयेच्या नजरेने बघितले जाते व त्यांना कमी लेखले जाते. यामुळे त्यांची स्वत:विषयीची प्रतिमा नकारात्मक होते आणि स्वप्ने खुजी होतात. म्हणूनच प्रज्ञाचक्षु तसेच शारीरिक दृष्ट्या विशेष व्यक्ती प्रशासकीय तसेच इतर उच्च पदांवर सहसा दिसून येत नाहीत. शारीरिक आव्हान पेलण्यासोबतच आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांना आणखी जास्त गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. प्रशासकीय,  शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रांत या तरूणांसाठी प्रोत्साहन, प्रेरणा व मार्गदर्शनाची यंत्रणा निर्माण करण्यासाठी ‘दीपस्तंम’ ने लोकसहभागातून ‘मनोबल’ या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या प्रज्ञाचक्षु व दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्हानिहाय करिअर समुपदेशन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कार्यशाळा व व्याख्याने उपलब्ध करून दिली जातात. दीपस्तंभच्या माध्यमातून राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा घेऊन प्रज्ञाचक्षु व दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड केली जाते.

या विद्यार्थ्यांना ‘मनोबल’ केंद्रात प्रवेश देऊन खालील सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

  • निःशुल्क निवास, भोजन व प्रशिक्षण.
  • UPSC, स्टाफ सिलेक्शन, बँक , MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन.
  • विशेष समुपदेशन, तज्ज्ञांचे आरोग्यविषयक मार्गदर्शन, प्रज्ञाचक्षुंसाठी रीडर्स क्लबअंतर्गत वाचकांची उपलब्धता.
  • लायब्ररी, आँडिओ लायब्ररी, ब्रेल लायब्ररी, अभ्यासिका इत्यादी सुविधा आधुनिक स्वरुपात.
  • व्यक्तिमत्त्व विकास व करीअर निवडीसंदर्भात विशेष मार्गदर्शन.
  •  संगणक, इंटरनेट, एंजेल, डेझीसारखे तंत्रज्ञान शिकण्यासाठी विशेष प्रशिक्षण.
  • 2015 – 16 मध्ये केंद्रात महाराष्ट्रातील ८२ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत – विविध परीक्षांमध्ये आतापर्यंत एकूण २२ विद्यार्थी यशस्वी.

प्रकल्प सल्लागार

डॉ. के. एच. संचेती, श्री. कृष्णगोपाल तिवारी (IAS),  श्रीमती नसिमा हुरजूक,  श्री. स्वागत थोरात,  श्री. भावेश भाटिया,
श्रीमती प्रांजल पाटील (IAS ), सोनाली नवांगूळ, श्रीमती मंजुषा कुलकर्णी,  श्री. धनंजय भोळे,  श्रीमती अल्पना दुबे (IAS)

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

”मैने पहलीबार जब दीपस्तंभ के इस अनोखे प्रोजेक्ट के बारे में सूना तो मुझे बहुत ज्यादा खुशी हुई । आजतक इस प्रकार का कार्य भारतवर्ष में कहीं नहीं हुआ है । इसलिए मैं दीपस्तंभ-मनोबल के साथ जुड गया । मैं जब पढाई करने के लिए झुझ रहा था, तब ऐसी सुविधाएं और मार्गदर्शन मिलता तो मेरी कठिनाईया यकिनन दूर होती ।

कृष्ण गोपाल तिवारी

देशातील पहिले प्रज्ञाचक्षु आयएएस

“ श्री यजुर्वेंद्र महाजन हे त्यांचा ध्येयाप्रति अत्यंत प्रामाणिक आहेत, उत्कट आहेत. अंध व अपंग विद्यार्थ्यांसाठी त्यांची सर्व शक्ती व कौशल्ये पणाला लावून एक कायमचे बंद असलेले दार त्यांनी उघडले आहे. दीपस्तंभला मनःपूर्वक शुभेच्छा”.

नसीमा हुरजूक

अध्यक्ष, हेल्पर्स ऑफ ह्यांडीकॅप, कोल्हापूर

“कधी-कधी माणूस लाजेने अक्षरशः अर्धमेला होतो, असं आजवर ऐकलं होतं. आमच्या सुदैवानं तो  क्षण दीपस्तंभच्या एका हृदयस्पर्शी कार्यक्रमात आला. डोळ्यावर काळा चश्मा, व्हिलचेअरने पण अतिशय प्रसन्न मुद्रेने येणारे शेकडो अंध व अपंग युवक-युवती बघून आम्ही स्तिमित झालो. ‘दीपस्तंभ’चे प्रा. यजुवेंद्र महाजन यांनी देशातील पहिले अंध-अपंग युवक-युवतींचे निवासी स्पर्धा परीक्षा केंद सुरू केले आहे. यामुळे अत्यंत गरीब कुटुंबातील या विद्यार्थ्यांना आता उज्ज्वल भविष्य घडविता येणार आहे. आम्ही येथून पुढील आयुष्यासाठी प्रेरणा घेऊन जात आहोत.”

समीक्षा व अनिकेत आमटे

लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

“माझे गाव कवठे एकंद. तालुका पाचगाव, जि.सांगली. 18 व्या वर्षी माझी 100% दृष्टी गेली. मराठी साहित्यात बी.ए. पर्यंत शिक्षण घेतल्यावर पुढे काय? हा प्रश्न निर्माण झाला. कुठेच काहीही मार्गदर्शन, आशेचा किरण दिसत नव्हता. अशावेळी दीपस्तंभ-मनोबल केंद्राची माहिती मिळाली व माझी निःशुल्क निवासी प्रशिक्षणासाठी निवड झाली. सध्या मी STI/BANK, PO परीक्षांची तयारी करत आहे. आम्हाला येथे ब्रेल व ऑडीओ लायब्ररी, अभ्यासिका व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळत आहे. महाजन सरांच्या प्रेरणेमुळे माझे मनोबल उंचावले असून मी नक्की अधिकारी होणारच !”

महादेव रामचंद्र पाटील

कवठे एकंद, जि.सांगली

“माझे आई-वडील आदिवासी शेतकरी आहेत. मी ५ वर्षांची असताना मला पोलिओ झाला आणि अपंगत्व आले. आयुष्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. जगावं कि मरावं काहीच काळात नव्हतं. मनाने मी पार खचून गेली होती. शिक्षण घेत असताना दीपस्तंभ केंद्रात प्रवेश मिळाला. यामुळे जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला. सध्या मी MPSC ची तयारी करत आहे. अपंगात्वर मात करत अधिकारी व्हायचंय ! हेच आता आयुष्यात ध्येय आहे. मला नवीन जीवन दिल्याबद्दल मनोबल केंद्राची व त्यासाठी सहकार्य करणाऱ्या देणगीदारांची खूप आभारी आहे.”

रीना कैलास बारेला

कुसुंबा

चला, आपण सर्वजण बदल घडवू

दीपस्तंभ हि स्वयंसेवी संस्था मुख्यतः लोकसहभागाद्वारे मिळणाऱ्या देणग्यांमधून चालते. आपण दिलेली देणगी दीपस्तंभच्या विविध उप्क्रमामधील प्रज्ञाचक्षु दिव्यांग, ग्रामीण, आदिवासी अनाथ, विद्यार्थ्यांनीच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाते.