ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्र

ग्रामीण भारतातील विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणा बाबत मार्गदर्शन पोहचून, त्यासाठी आवश्यक साहित्य, साधने व तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, आणि जेथे सर्वात जास्त आवश्यक आहे तेथे मौल्यवान शिक्षण देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

भारतात ६ लाख खेडी आहेत. आधुनिक युगात या खेड्यांमध्ये आज आपल्याला वेगवेगळी बिस्किटं, सौंदर्य क्रीम किंवा मोबाईल रिचार्जसुद्धा मिळू शकतो. पण… पुस्तक विकत, वाचायला किंवा बघायलाही मिळू शकत नाही.

आपल्या या खेड्यांमधील घरे लहान व कोंदट असतात, घरात कायम गोंगाट असतो, वीजही नियमित नसते. त्यामुळे घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण व प्रोत्साहन नाही. त्यातही मुलगी असेल तर तीला अभ्यास सोडून घरातील सर्व प्रकारचे कामे करावी लागतात.
गावात देशपातळीवरच्या राजकारणापासून तर, आयपीएलच्या क्रिकेटपर्यंत चर्चा घडतात ; मात्र अभ्यास कसा करायचा ? करिअर कसे निवडायचे ? कोणते कोर्सेस किंवा व्यवसाय शासकीय मदतीने करता येतील ? याबाबत योग्य माहिती व मार्गदर्शन गावात मिळू शकत नाही. कुणाला विचारावे? कोण मदत करेल ? काहीच माहीत नाही. या सर्व प्रश्न व समस्यांवर उत्तर म्हणजे, दीपस्तंभ ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्र.

कार्यपद्धती

गावकऱ्यांच्या सहभागातून तसेच वर्गणी जमा करून हा ज्ञानप्रकल्प ग्रामीण भागात सुरू करण्यात येतो. दीपस्तंभच्या मुख्य कार्यालयातून व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते.

दीपस्तंभ ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्राचे ३ महत्वाचे घटक आहेत

ग्रंथालय

शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रम पुस्तके, करिअर विकास पुस्तके, स्पर्धात्मक परीक्षा पुस्तके आणि सामान्य वाचन. ई-पुस्तकांचा विस्तृत संग्रह या व्यतिरिक्त महिलांसाठी विशेष पुस्तके आणि मासिके उपलब्ध आहेत.

अभ्यासिका

मुले व मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिकेची व्यवस्था असते. वेळेचे नियोजन असते. शांत व शिस्तीचे वातावरण असते. इन्व्हर्टर बॅकअप असतो. ठरविलेल्या वेळी विद्यार्थी योग्य वातावरणात अभ्यास करू शकतात.

मार्गदर्शन केंद्र

रविवारी व सुटीच्या दिवसांमध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, आवश्यक विषयांवर मार्गदर्शन करतात. शैक्षणिक, करिअरबाबत, व्यक्तिमत्व विकासाबाबत आपल्याकडील माहिती व ज्ञान विद्यार्थ्यांना देतात. शैक्षणिक सॉफ्टवेअर, एलसीडी प्रोजेक्टर, कॉम्प्युटरच्या मदतीने अनेक विषयांबाबत मार्गदर्शन केले जाते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधेमुळे जगभरातील तज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधुन मार्गदर्शन घेता येते.

वैशिष्टे

हा प्रकल्प गावाच्या प्रत्यक्ष सहभागाने उभारला जातो. एकूण खर्च 3 लाख रुपये असतो. गावातील व्यक्ती 30% रक्कम जमा करतात. ७0% रक्कम परिसरातील उद्योग-व्यवसाय, शासकी योजना अथवा मोठ्या कंपनीच्या सीएसआर निधीतून जमा केली जाते.

Non Resident Village म्हणजेच गावातून शहरात गेलेल्या नोकरदार किंवा व्यावसायिक यांच्याकडून वार्षिक निधी उभारला जातो.

या केंद्रासाठी एक पूर्ण वेळ व्यक्तीची सुयोग्य मानधनावर नेमणूक केली जाते. त्याला प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून 30 रुपये महिना किमान शुल्क घेतले जाते.

दीपस्तंभ मुख्य कार्यालयात एक प्रशिक्षित व्यक्ती विभागप्रमुख म्हणून कार्यरत असते. नवीन पुस्तके, संसाधने, तज्ञ व्यक्ती तसेच नवनवीन उपक्रम याबाबत माहिती पुरवून समन्वय साधला जातो.

खेड्यातील विद्यार्थ्यांप्रती कळकळ असणारे विविध क्षेत्रातील व्यक्ती स्वयंप्रेरणेने वेळ देवू शकतात. अशा समाजशिक्षकांना योग्य नियोजनाद्वारे खेड्यात पाठवून त्यांच्या ज्ञान व अनुभवाचा फायदा करवून दिला जातो.

मान्यवर व विदयार्थ्यांच्या प्रतिक्रीया

“महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांवरील गरीब शेतकरी, शेतमजुरांच्या मुला – मुलींसाठी दीपस्तंभ ने तन – मन – धनाने जे कार्य उभारले आहे ते बघून मनःपूर्वक आनंद वाटला. यामुळे असंख्य विदयार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्याची खात्री वाटते.”

पद्मश्री नीलिमा मिश्रा

मॅगसेसे अवॉर्ड सन्मानित

चला, आपण सर्वजण बदल घडवूया

दीपस्तंभ हि स्वयंसेवी संस्था मुख्यतः लोकसहभागाद्वारे मिळणाऱ्या देणग्यांमधून चालते. आपण दिलेली देणगी दीपस्तंभच्या विविध उपक्रमामधील प्रज्ञाचक्षु, दिव्यांग, ग्रामीण, आदिवासी, अनाथ, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाते.