संजीवन

१८ वर्षावरील, आई व वडील दोन्ही नसणाऱ्या १२ वी उत्तीर्ण अनाथ मुला-मुलींसाठी नि:शुल्क निवासी स्पर्धा परीक्षा व कौशल्य प्रशिक्षण केंद्र

ज्या लहान मुलांच्या आई-वडिलांची जन्मत:च ओळख नसते किंवा ज्यांच्या आई-वडीलांचे बालपणीच निधन झालेले असते, अशा किंवा ज्या अनाथ व निराधार मुला-मुलींना त्यांचे नातेवाईक सांभाळतात, अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या किंवा स्वयंसेवी सस्थांच्या बालगृहात ठेवले जाते. मात्र नियमानुसार वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या मुलांना तेथून बाहेर पडून स्वत:च्या पायावर उभे राहावे लागते. मात्र त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, आर्थिक स्त्रोत,  कौशल्ये व संधी यांच्या अभावामुळे आयुष्याची योग्य दिशा मिळत नाही, त्यामुळे त्यांचे आयुष्य भरकटते. ज्यांचे जगात कोणीही नाही, ज्यांना प्रेम, मैत्री या भावनांची कधी ओळखच झाली नाही, अशा युवक-युवतींना आयुष्यात सन्मानाने उभे करण्यासाठी दीपस्तंभ बहुउद्देशिय संस्थेने ”संजीवन’ प्रकल्प सुरू केला आहे.

या प्रकाल्पांतर्गत महाराष्ट्रातील अनाथ व निराधार असलेल्या मुला-मुलींची निवड केली जाते व त्यांना विनामूल्य निवासी स्पर्धा परीक्षा व कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. सैन्य भरती प्रशिक्षण, पोलिसभरती, सुरक्षा रक्षक प्रशिक्षण, रुग्णालय व्यवस्थापन प्रशिक्षण, दुकानांमधील विक्री सहाय्य प्रशिक्षण तसेच गरजा आणि क्षमतांनुसार अन्य कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या विवाहासाठी देखील संपूर्ण सहाय्य केले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला एका परिवाराशी जोडून देऊन त्या परिवाराला त्याचे पालकत्व दिले जाते. अशा प्रकारे प्रेम, आधार व नात्यांचीही गरज पूर्ण होते.

पात्रता :

  • १८ वर्ष पूर्ण झाल्याने बालगृहातून बाहेर पडलेली मुले-मुली.
  • नातेवाईकांकडे किंवा एकटी राहणारी, आई-वडील नसलेली, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुले-मुली
  • किमान १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण.
  • इतर शिक्षण घेण्याची ईच्छा असणारे, स्पर्धा परीक्षा किंवा इतर कौशल्य प्रशिक्षण घेण्यास ईच्छुक.

प्रकल्प सल्लागार

डॉ. सुनीलकुमार लवटे ( सुप्रसिद्ध लेखक ),  डॉ. अविनाश सावजी ( ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ),  डॉ. गिरीश कूलकर्णी
( सुप्रसिद्ध समाजसेवक ) , श्री.शिवदीप लांडे ( IPS ), श्री. पुखराजजी पगारिया ( सुप्रसिद्ध उद्योजक ).

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

“१८ वर्षावरील अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी आपल्या देशात कोणतीही भक्कम योजना किंवा व्यवस्था नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी संजीवन प्रकल्प एखाद्या दीपस्तंभासारखा आणि समाजासाठी आदर्शवत आहे.”

प्राचार्य डॉ. श्री. सुनीलकुमार लवटे

सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

“मी तिवसाळा, ता. घंटाजी, जि. यवतमाळ येथील रहिवासी आहे. मला जन्मतः 75% दृष्टी नाही. मी लहान असतांनाच माझे वडील आईला व मला घरातून सोडून निघून गेले. सन 2008 मध्ये मी नवोदयला 9 वी मध्ये शिकत असतांना आईची हत्या झाली. या जगात मी अनाथ झालो. पुढे अडचणींवर मात करत मी बी.ए. कसेबसे पूर्ण केले. मात्र जीवनात सर्वदूर अंधार दिसत असतांना यजुर्वेंद्र महाजन सरांची भेट व ‘संजीवन’ ला प्रवेश मिळाला. माझं जीवन चांगलं व्हावं, या जिद्दीने मी अभ्यासाला लागलो आहे. मी नक्की अधिकारी होईल व माझ्यासारख्या अंध-अपंग, अनाथांच्या कल्याणासाठी काम करेन.”

शुभम गेवानंद खरतडे

तिवसाळा, ता. घंटाजी, जि. यवतमाळ

चला, आपण सर्वजण बदल घडवू

दीपस्तंभ हि स्वयंसेवी संस्था मुख्यतः लोकसहभागाद्वारे मिळणाऱ्या देणग्यांमधून चालते. आपण दिलेली देणगी दीपस्तंभच्या विविध उपक्रमामधील प्रज्ञाचक्षु, दिव्यांग, ग्रामीण, आदिवासी, अनाथ, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाते.